बॅंकॉक -भारताचा नवोदित परंतु गुणवान बॅडमिंटनपटू किरण जॉर्ज याने येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या वेंग हॉंगचा 21-11, 21-19 असा केवळ 39 मिनिटांत पराभव केला.
बीडब्ल्यूएफ जागतिक सुपर सिरीज 500 मालिकेतील जॉर्जची ही आजवरची सर्वात यशस्वी कामगिरी ठरली आहे. जिथे सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेनसारखे मानांकित खेळाडू अपयशी ठरले तिथे किरण जॉर्जने ही अफलातून कामगिरी केली आहे.
आता या फेरीत त्याचा मुकाबला फ्रान्सचा तोमा पापोव व हॉंगकॉंगचा नेग का लोंग अंगूस यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. महिलांच्या एकेरीत मात्र, भारताच्या अस्मिथा छलियाला पराभव पत्करावा लागला. तिच्यावर स्पेनच्या मानांकित व ऑलिम्पिक पदक विजेत्या कॅरोलिना मरिनने 21-18, 21-13 अशी सहज मात केली.