बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बारामतीतील श्री. चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येत्या 1 जानेवारी 2022 ते 22 जुलै 2022 यादरम्यान चैतन्य मातृत्व योजना राबवणार आहे. ही योजना देशातील पहिली योजना असेल. या योजनेमध्ये 101 अपत्यहीन जोडप्यांना मोफत टेस्ट ट्यूब बेबी उपचार केले जाणार आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. विवाह झाल्यानंतर अल्पावधीत गर्भधारणेचे प्रमाण कमी होत असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेतून बारामती मध्ये रुग्णसेवेसाठी आलेल्या डॉ. आशिष जळक व हॉ. प्रियांका जळक या दाम्पत्याने बारामतीत श्री. चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून सेवेला सुरुवात केली.
अल्पावधीत आजपर्यंत पाच हजारपेक्षा अधिक दाम्पत्यांना येथील उपचाराचा फायदा झालेला आहे. डॉ. जळक यांनी आजपर्यंतच्या कालावधीत रुग्ण सेवेबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना मोफत उपचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून अनेक कुटुंबामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागाची आजची गरज आणि परिस्थिती या सर्वाचा विचार करून गेल्या काही वर्षापासून डॉ. अशिष जळक यांनी चैतन्य मातृत्व योजना ही अजिर पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केली आणि पाहता पाहता ती महाराष्ट्रात पोचली.
मैट्रोपोलिटिन शहरांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचार खूप महागडे आहेत. त्या तुलनेमध्ये श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाचा विचार करून या उपचाराची वाजवी व किफायतशीर प्रक्रिया केली. जी अपत्यहीन कुटुंबासाठी अत्यंत मोलाची ठरली.
यावर्षी 1 जानेवारी 2022 ते 22 जुलै 2022 या कालावधीत श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे देशातील पहिला प्रयोग सामाजिक उत्तरदायित्व म्हणून साकारणार आहे. यामध्ये 101 अपत्यहीन जोडप्यांवर मोफत टेस्ट ट्यूब बेबी उपचार केले जाणार आहेत. पवार यांनी या राज्यासाठी राज्याच्या विकासासाठी आर्थिक प्रगतीसाठी त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या विचारांचा वसा जपत अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही योजना राबविली जाणार असून येणाऱ्या वर्षात त्यांच्या वाढदिवसापर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
या योजनेची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 2 जानेवारी 2022 रोजी बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दतात्रेय भरणे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.