पुणे – लसीकरण मोहिमेचाही राजकीय व्यक्तींनी फायदा उठवला नाही तर कसे होईल? या विषयातही राजकारणी आता मागे पडले नसून, मतदारांना नाव शोधण्यासाठी मदत म्हणून जसे निवडणूक मतदानावेळी बूथ लावले जातात, तसे बूथ आता शहरात ठिकठिकाणी लसीकरण नोंदणीसाठी दिसू लागले आहेत.
महापालिकेची निवडणूक येत्या एक ते सव्वा वर्षांत आहे. पुढील सहा महिन्यातच आजी, माजी, इच्छुक यांचे भरगच्च कार्यक्रम, कार्य अहवाल, भेटी गाठी, कार्यकर्तृत्त्व गान वगैरे सुरू होईल. मात्र त्या आधीच लसीकरणाची आलेली संधीही आजी-माजी, कार्यकर्ते आणि इच्छुकांनी घेतली आहे.
लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अनेकांना ती नोंदणी करता येत नाही, किंवा अवघड जाते. हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंट लाइन वर्कर्सची नोंदणी त्यांच्या त्यांच्या संस्थांनी केली, परंतु आता लसीकरण जवळपास “ओपन टू ऑल’ होऊ लागले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे त्यांना मदत करून परमार्थाबरोबरच स्वार्थही साधण्याचा प्रयत्न या राजकीय मंडळींनी सुरू केला आहे. त्यांनी चौकात, दर्शनी भागात, रस्त्यांवर असे बूथ लावले आहेत.
नागरिकांना त्यांच्या मोबाइलमधून ही नोंदणी करून दिली जात आहे. त्यासाठी त्यांनी तीन-चार कार्यकर्त्यांची नियुक्ती बुथवर केली आहे. त्यांच्यामार्फत ही नोंदणी करून दिली जात आहे. या बुथवर फ्लेक्स आणि पक्षाचा झेंडा, असा जंगी तामझाम दिसून येत आहे.