कात्रज – गरवारे कॉलेज स्टेशन ते आनंद मेट्रोचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. याचा आनंद आहे. मात्र, सातत्याने मूलभूत सुविधेसह विकास प्रकल्प निधीबाबत मिळणारी दुय्यम वागणूक व स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडा तयार असताना मंजुरी विना रखडला असल्याने कात्रजच्या नारिकांमध्ये नाराजी आहे, अशा शब्दांत नमेश बाबर यांनी संताप व्यक्त केला.
पुणे शहरातील विशिष्ट भागाचा विकास होतो. मात्र तीनपट कर भरणाऱ्या कात्रजच्या वाट्याला केवळ प्रतीक्षाच आहे. याचा निषेध कै. सुदामराव बाबर प्रतिष्ठाण व स्व. अजितदादा बाबर फाउंडेशनच्यावतीने नगरसेविका अमृता बाबर व स्वराज बाबर यांच्या पुढाकाराने प्लॅस्टिकची मेट्रोची प्रतिकृती तयार करून ती संत खेतेश्वर चौकातून बैलगाडीने ओढत आणत विडंबनात्मक आंदोलन करीत करण्यात आला.
यावेळी आंदोलनाचे प्रास्ताविक स्वराज बाबर यांनी केले. नगरसेविका अमृता बाबर म्हणाल्या की, कात्रज मेट्रोचा विकास आराखडा तयार असून राज्यसरकार सकारात्मक आहे. मात्र, केंद्र सरकारची मंजुरी मिळाली नाही. कात्रजला आठ पाण्याच्या टाक्या असून 250 एमएलटी पाणी मिळते. मात्र, अन्य भागाला प्राधान्य दिले जात असून एकेकाळी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कात्रजकारांच्या घशाची कोरड कायम आहे. कात्रज परिसरात वाहतूक कोंडी, अपघात समस्या गंभीर आहेत. कात्रजला कायमच निधी वाटपात दुय्यम स्थान दिले जाते.
आंदोलनप्रसंगी दीपक गुजर, सुनील मांगडे, अनिल कोंढरे व बीबीशन खरात यांनी भाषणे केली. माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणेकरांना स्वच्छ हवा, पर्यावरणासाठीच कात्रजच्या टेकड्या आठवतात. मात्र, मूलभूत सुविधा व विकास प्रकल्पांबाबत निधी देताना विसर का पडतो? कात्रज उपनगरासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करा व भरीव निधी द्या. राज्यकर्ते व प्रशासनाने दुटप्पी भूमिका सोडवी. अन्यथा भविष्यात हजारोंच्या संख्येने कात्रजकर रस्त्यावर उतरतील.
– नमेश बाबर, युवानेते, कात्रज