पुणे – बनावट कंपन्या स्थापन करून मालाची देवाण-घेवाण न करता बनावट इनव्हॉइसद्वारा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट देणाऱ्या व्यक्तीस जीएसटी चौकशी महासंचालनालय अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तुषार मुनोत असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या नावे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशात कंपन्यांची नोंदणी होती. या कंपन्यांच्या नावावर प्रत्यक्ष वस्तूंची देवाण-घेवाण न करता खोट्या इन्व्हाइसची देवाण-घेवाण करून इनपुट एक्स क्रेडिटचा गैरव्यवहार करण्यात येत होता. त्यामुळे कर विभागाचे 52 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
जीएसटी पुणे विभागाचे सुहेल काझी यांनी पत्रकात म्हटले आहे की, मुनोत हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे चौकशीनंतर लक्षात आले.
त्यानंतर तपास करून त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खेड्यातून अटक करण्यात आली. जीएसटीतर्फे विशेष सरकारी वकील ऍड. संदीप घाटे यांनी युक्तीवाद केला.