नवी दिल्ली : आपल्या देशाला भारताला आणखी राफेल विमाने पुरवण्याची इच्छा आहे, असे भारत दौऱ्यावर असणाऱ्या फ्रान्सच्या फ्लोरेन्स परली यांनी शुक्रवारी सांगितले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, भारताने केलेल्या कोणत्याही अतिरिक्त गरजेच्या विनंतीस प्रतिसाद देण्यास फ्रान्स नेहमीच तयार आहे. आम्ही खुले आहोत आणि भारताने निर्णय घेतला तर आणखी राफेल देण्यास तयार आहोत.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार 36 पैकी 33 राफेल विमाने देण्यात आली आहेत. उर्वरित तीन विमाने एप्रिल 2022 मध्ये हस्तांतरित करण्यात येतील. फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांची ही दोन वर्षातील दुसरी भारत भेट आहे. राफेल विमाने भारतीय हवाई दलात सामावून घेण्याच्या अधिकृत सोहळ्यातही त्या सहभागी झाल्या होत्या.
भारतीय हवाई दल या विमानांवर समाधानी असल्याने मी आनंदी आहे. करोना च्या साथीत आम्ही राफेल विमाने वेळेत देऊ शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो. ती खरोखरच एक ध्येयपूर्ती होती. मी नशीबवान समजते कारण गेल्या वर्षी ही विमाने हवाई दलात समाविष्ट करण्याच्या सोहळ्यात मी सहभागी होऊ शकले. द्विपक्षीय संबंधात तो एक अमूल्य ठेवा आहे. या विमानांचा वापर ही आमची ताकद आहे. यातून नव्या विकासाचा कक्ष खूला झाला आहे.
इंडो पॅसिफिक क्षेत्राशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, भूगोल बदलत नाही.
फ्रान्स हाही इंडो पॅसिफिक देश आहे. आम्हाला अनेक स्तरीय संबंध दृढ करायचे आहेत. या धोरणाच्या केंद्रस्थानी अर्थातच भारत असेल. आम्ही ऑस्ट्रेलिया शी खूप चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. मात्र नंतर ऑस्ट्रेलिया ने त्यांचा निर्णय घेतला. मला त्यावर काही भाष्य करायचे नाही मात्र आम्ही या भागात हेच धोरण अवलंबणाऱ्या देशांसाठी महत्त्वाचे भागीदार असू.