सिडनी : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे या प्रकारास इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू या प्रस्तावाच्या विरोधात आहे.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोन, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टिम पेन, उपकर्णधार ट्रॅव्हिस हेड आणि ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने देखील चार दिवसीय कसोटीस नापसंती दर्शविली आहे.
मॅकग्रा म्हणाला की, माझ्यासाठी पाच दिवसीय कसोटीला विशेष जागा असून तिचा कालावधी कमी झालेला मला आवडणार नाही.
दरम्यान, हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी असेल. जर हा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यात यश आले, तर कसोटी सामना चार दिवसांचाच राहिल. कसोटी सामने ४ दिवस केले तर एका दिवसात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील.
अनिर्णित राहणारे कसोटी सामन्यांच्या दिवसांची संख्या पाच दिवस करूनही बरेच सामने निकाली निघत नाहीत. दुसरीकडे काही सामने तर तीन दिवसांतच संपतात. त्यामुळे कसोटीला गतवैभव मिळावे यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. नव्या वर्षात आयसीसी कसोटी खेळणा-या सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना बैठकीचे निमत्रंण देणार असून त्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.