नगर (प्रतिनिधी) – शहरातील सारसनगर, एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीबरोबरच कल्याण रोड, केडगावात आणखी चार करोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जिल्ह्यात संगमनेर व राहात्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 258 झाली आहे, तर 53 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आज आणखी सात नवीन करोनाबाधित सापडले असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नगर शहरात नगर-कल्याण रोड परिसरातील 55 वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे. केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी व 12 वर्षांच्या मुलाचा अहवालही करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित परिसर सील केला असून, संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू केला आहे.
तसेच राहाता तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले असून, खंडोबा चौक येथील 13 वर्षीय मुलीगी व 30 वर्षीय व्यक्ती बाधित आहेत. संगमनेर तालुक्यात दोन व्यक्ती बाधित आहेत. त्यातील एक शहरातील 30 वर्षीय व्यक्ती आहे, तर दुसरी व्यक्ती ही मुंबईहून संगमनेरला आली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज जिल्ह्यात तब्बल सात करोनाबाधित सापडले आहे, तर त्यातील 53 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.
संपर्कात आलेल्या नागरिकांचा प्रशासनाने शोध सुरू केला असून, संबंधित परिसर हा सील करण्यात आला आहे. दरम्यान, नवनागापूर येथील एका डॉक्टरला व त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून, त्यांना त्यांच्या घरीच देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.