नगर – महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव दोन वर्षापूर्वीच करण्यात आला होता, मात्र मनपा प्रशासनाने अद्यापही पुतळा बसविला नाही. मनपा प्रशासनाने लवकरात लवकर पुतळा बसवावा अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली. अन्यथा (19 फेब्रुवारी) शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.
माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने वादग्रस्त वक्तव्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचवेळी महापालिकेत पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली होती. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.