आयोध्या – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या पायाचे काम सुरू करण्यात आले असून एकूण 44 स्तर असलेल्या पायाचे सहा स्तर आत्तापर्यंत तयार करण्यात आले आहेत. ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व पायाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसात वादळामुळे आणि पावसामुळे कामकाज बंद असल्याने या कामावर थोडाफार फरक पडला; पण नजीकच्या कालावधीमध्ये हे काम वेगाने पूर्ण केले जाईल अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
एकूण 400 फूट लांब आणि 300 फूट रुंद या क्षेत्रांमध्ये हा पाया उभारण्यात येत आहे. या पायासाठी एकूण 44 स्तर असून प्रत्येक स्तराची उंची 12 इंच असणार आहे. बारा इंचाचे सिमेंट कॉंक्रीट घेतल्यानंतर ते यांत्रिक पद्धतीने दाबल्यानंतर त्याची उंची 10 इंच होत आहे. नंतर त्याच्यावर दुसरा स्तर टाकला जात आहे. हा पाया उभारण्यासाठी जो खड्डा करण्यात आला होता, त्या खड्ड्यातून बाहेर टाकण्यात आलेली माती आयोध्यातील नागरिक प्रसाद म्हणून घरी घेऊन जात आहेत.
ट्रस्टनेही या मातीचे पॅकबंद डबे तयार केले असून ते डबे नागरिकांना प्रसाद म्हणून दिले जात आहेत.मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात असताना जी माती खड्ड्यातून बाहेर आलेली आहे. ती कारसेवक पुरम येथे ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी छोट्या डब्यामध्ये ही माती भरण्यात येत असून नागरिकांनाही माती प्रसाद म्हणून दिली जात आहे.