पुणे (प्रतिनिधी) – लोहमार्ग पोलिस एका महिलेसाठी देवदूत ठरले आहेत. रेल्वे ट्रॅक अलांडताना जखमी होऊन पडलेल्या एका महिलेला चार किलोमीटर झोळीत उचलून नेऊन रुग्णालयात दाखल करून प्राण वाचवले आहेत. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होते आहे. आशा दाजी वाघामारे (वय.42,रा.थेरगाव फनसावाडी कार्ला) असे या महिलेचे असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 31 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास आशा वाघमारे ह्या जांबरुग गावाजवळ रेल्वे पटरी अलांडत होत्या. त्यावेळी कोणत्यातरी धावत्या रेल्वेगाडीची धडक लागून त्या खाली पडल्या. त्यामध्ये त्यांच्या मनक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, लोणावळा स्टेशन मास्तर यांना याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत लोणावळा दुरक्षेत्र लोहमार्गाला याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक गोसावी व त्यांच्या पथकाला तत्काळ जखमी महिलेला मदत करण्यास सांगितले होते.
पोलिस कर्मचारी व चार हमालांचे एक पथक कर्जत रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या एका मालगाडीत बसून रवाना झाले. मदतीसाठी कर्जत लोहमार्ग ठाण्याचे काही कर्मचारी देखील मदतीसाठी आले. महिला पडेलेला भाग दुर्गम असल्यामुळे रुग्णवाहिका तेथे पोहचू शकत नव्हती. शेवटी पोलिसांनी कपड्यांची झोळी करून महिलेला त्यामध्ये टाकले. त्यानंतर घटनास्थळापासून तब्बल चार किलोमीटर पायी चालत पळसदरी रेल्वेस्टेशन गाठले. तेथे रुग्णवाहिकेत महिलेला टाकून कर्जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र मार गंभीर लागला असल्यामुळे महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या धोक्याच्या बाहेर आल्या.
अपघात की घातपात असा संशय आल्यामुळे पोलिसांनी संबंधीत महिलेची चैकशी केली असता, रेल्वे पटरी अलांडत असताना, दुसऱ्या गाडीची धडक लागून आपण पडल्याचे सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता मिळाल्यानंतर याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. जखमी महिलेचा मुलगा नाना दाजी वाघमारे (वय.22) हा ससून येथे आला. पोलिसांनी दाखविलेले प्रसंगावधान व तत्काळ मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे जखमी महिलेचे प्राण वाचले. यावेळी महिलेस त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक वासये-पाटील, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.आर. गैड, पोलिस निरीक्षक गोसावी, कर्मचारी जाधव, गांगुर्डे, गायकवाड यांच्या पथकाने केली.