पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- ताप आणि घशात इन्फेक्शन असल्यामुळे देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पुण्यातील भारती हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 13) रात्री त्यांना दाखल केले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे भारती हाॅस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या पुण्यात राहात असून, त्या 89 वर्षांच्या आहेत. बुधवारी अचानक त्यांना आशक्तपणा आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांच्या टीमने सर्व तपासणी केल्या असून, त्यांच्या घशात इन्फेक्शन आणि ताप असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार उपचार सुरू असून, प्रकृतीही स्थिर आहे. दरम्यान, त्यांना ताप आणि इन्फेक्शन कमी झाल्यावर डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.