लाहोर – पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुसर्रफ हे सध्या अत्यवस्थ असून संयुक्त अरब अमिरातीमदील एका रुग्णालयात त्यांना कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. परवेझ यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी आज ही माहिती दिली. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती मंत्री असलेले फवाद चौधरी एकेकाळी मुशर्रफ यांचे प्रवक्तेही राहिले होते.
मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे चौधरी यांनी सांगितले. आपण मुशर्रफ यांचे पुत्र बिलाल यांच्याशी बोललो असून त्यांच्याकडून या वृत्ताची खातरजमा केली आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती ठिक नाही. ते शुद्धीवर आहेत आणि ते लवकरच बरे होतील असे “ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग ओव्हरसीज’ चे अध्यक्ष इफ्तजाल सिद्दीक यांनीही म्हटले आहे. मुशर्रफ यांच्या मृत्यूसंदर्भातील खोट्या वृत्तावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले. “ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग ओव्हरसीज’ची स्थापना मुशर्रफ यांनीच केली होती.
78 वर्षीय मुशर्रफ हे 1999 पासून 2008 पर्यंत पाकिस्तानचे अध्यक्ष राहिले होते. त्यांना माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांची हत्या आणि लाल मशिद हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे. 2007 मध्ये राज्यघटना बरखास्त केल्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोपही आहे. 2016 पासून ते दुबईमध्येच रहात आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी ते 2016 मध्ये दुबईला गेले. तेंव्हापासून ते पाकिस्तानमध्ये परत आलेलेच नाहीत.