पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होत असल्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाकडून रुक्मिणी मातेच्या चरणांवर उद्या (शनिवार दि.11 जून) रोजी सायंकाळी वज्रलेप करण्यात येणार आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ही माहिती दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होत असल्याचे एका पाहणीतून समोर आल्यामुळे मंदिर समितीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाला पाचारण केले होते. पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार श्रीविठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे. तर श्री रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाली असून मूर्ती सुरक्षित आहे.
त्यामुळे केवळ रुक्मिणी मातेच्या चरणांवर वज्रलेप करण्याची सूचना केली होती. करोनानंतर प्रथमच श्रींचे चरणस्पर्श दर्शन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर समितीकडून सुरू करण्यात आले आहे. याच दिवशी भाविकांना रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याचे लक्षात आले होते.
पुरातत्व विभागाच्या औरंगाबादच्या पथकाने दिलेल्या अहवालानुसार रुक्मिणी मातेचे पाय वगळता मूर्तीची इतर कोणत्याही भागाची झीज झालेली नाही. त्यामुळे रुक्मिणी मातेच्या पायावरच वज्रलेप करण्यात यावा, असा अहवाल दिला होता.
त्यानुसार मंदिर समितीच्या बैठकीत आषाढी यात्रेपूर्वी वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवार 11 जून रोजी उपअधीक्षक पुरातत्व, रसायन, भारतीय पुरातत्व, सर्वेक्षण, विज्ञान शाखा औरंगाबाद विभाग, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा औरंगाबाद यांच्या मार्फत रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्यात येणार आहे.