लंडन :- ब्रिटनमध्ये एका गोठलेल्या तलावामध्ये 4 मुले बुडाली आहेत. या मुलांना बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे ही घटना घडली.
संपूर्ण ब्रिटनमध्ये सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्यावर बर्फ साचले होते. या बर्फाच्या थरावरच काही मुले खेळत होती. मात्र त्याच वेळी बर्फाचा हा थर तुटला आणि ही मुले पाण्यामध्ये पडली.
बर्फाच्या पाण्यात अचानक पडल्यामुळे या मुलांच्या शरीराचे तापमानदेखील झपाट्याने कमी झाले. आपत्कालिन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी या मुलांना पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात पोहोचवले आहे. मात्र अतिशीत पाण्याच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यामुळे या मुलांना हृद्यविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे या मुलांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
ब्रिटनमध्ये सध्या हिमवर्षाव सुरू असून रस्त्यांवर बर्फाचे थर साचले आहेत. त्यामुले अनेक महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ब्रिटनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप देखील सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. बर्फ पडत असल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.