नवी दिल्ली – ॲडलेड टेस्टमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. भारताचा दुसरा डाव केवळ 36 वर आटोपला होता. कसोटी क्रिकेटमधली भारताची ही निचांकी धावसंख्या ठरली होती. या पराभवानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने दणदणीत विजय मिळविला. संघाच्या या विजयावर आता क्रीडा आणि इतर सर्वच क्षेत्रांतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
क्रिकेटमधील अनेक माजी खेळाडूंनी देखील कौतूक केलं आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे नावही जोडले गेले आहे. त्याने भारतीय संघाला प्रतिभावान खेळाडूंचा संघ असं म्हटले आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर यावर प्रतिक्रिया व्यक्त करत संघाचे चांगलेच कौतुक केलं आहे.
शोएब अख्तरने म्हटले आहे की, ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या माणसाला पोत्यात घालून मारता त्याप्रमाणे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्याने पुढे म्हटले आहे की, भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव झाला होता आणि त्याच्यांवर सगळीकडूनच टीकेची झोड उडाली होती अशावेळी भारतीय संघाने संघाने आपली प्रतिभा दर्शविली आणि विजय साकारला.
शोएब अख्तर म्हणाला की, भारतीय संघात तीन प्रमुख फलंदाज नव्हते, तरीही याची संघाला काहीच उणिव भासली नाही. कर्णधार अंजिक्य रहाणेच्या नेतृत्त्वाची प्रशंसा करताना तो म्हणाला की, अंजिक्यने अत्यंत शांतपणे आणि संयमी नेतृत्व केले पण त्याच्या यशाचा आवाज आज सर्वत्र ऐकू येत आहे. यावेळी त्याने एक म्हण सांगितली की, शांतपणे मेहनत करा जेणेकरून यशाचा आवाज होऊ शकेल.
युवा गोलंदाज मोहम्मद सिराजबाबत शोएब अख्तर म्हणाला की, युवा खेळाडू मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याने संधीच सोनं करत 5 विकेट घेतल्या. वडिलांच्या निधनानंतर तो मायेदशी जाऊ शकला नाही मात्र, या कामगिरीने त्यांने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर गिलबद्दल बोलताना तो म्हटला की, तो स्टार खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. तसेच त्याने यावेळी अष्टपैलू खेळाडूं रविंद्र जेडजाच्या खेळीचं देखील कौतूक केलं.
शोएब म्हणाला की, भारतीय संघाच्या कामगिरीने दर्शविले आहे की त्यांच्यात धैर्य, अंतःकरण आणि प्रतिभा आहे. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ खचला नाही तर त्यांनी आव्हानांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करत यश मिळवलं. जेव्हा अशाप्रकारचे धैर्य संघ दाखवतो तेव्हा तो संघ कोणत्या धर्माचा आणि कोणत्या देशाचा आहे याचा काहीही फरक पडत नाही.