या कारणांमुळे रजनीकांत यांची राजकारणातून माघार

चैन्नई – दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे बरे झाल्यामुळे त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. मात्र, उणेपुरे एक-दोन दिवसातच रजनीकांत यांनी आपण राजकारणात उतरणार नसल्याची घोषणा केली.

त्यांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. कारण 3 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी आपण पुढील वर्षी तामिळनाडूची विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती आणि 31 डिसेंबरला आपल्या पक्षाची ते घोषणा करणार होते. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. तेव्हा तामिळनाडू राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते.

मात्र रजनीकांत यांनी असे अचानक पाऊल मागे घेतल्याने अनेकांना धक्‍का बसला आहे. याबाबत रजनीकांत यांनी स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे.

मात्र, रजनीकांत यांनी डाव मांडण्या अगोदर तो डाव मोडल्याने अनेकांच्या चर्चांना उधाण आले आहे. रजनीकांत यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय कशामुळे घेतला असेल, काय कारणे असतील असे अनेक प्रश्‍न चर्चिले जात आहेत.

यातील पहिले कारण असे की, रजनीकांत यांना त्यांच्या डॉक्‍टरांनी धूळ आणि ऊन्हापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना रक्‍तदाबातील चढउतार आणि थकवा जाणवल्यामुळे 25 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे.

दुसरी शक्‍यता अशी आहे की, जरी तामिळनाडूतील अनेक दिग्गज अभिनेते राजकारणात यशस्वी ठरले असले तरी आंध्र प्रदेशातील सुपरस्टार चिरंजीवी यांना मात्र राजकारणात पाहिजे तसा जम बसविता आलेला नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून जेवढी प्रसिद्ध आणि चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले रजनीकांत राजकारणातही यशस्वी होतील याची खात्री देता येत नाही.

तिसरी अशी शक्‍यता वाटते की, तामिळनाडूत तमिळी संस्कृतीचा बोलबाला आहे. जेव्हा रजनीकांत यांनी राजकारणात येणार असल्याचे सूतोवाच केले होते तेव्हा ते तमिळ नसल्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. कारण रजनीकांत मूळ महाराष्ट्रीय आहे. त्यांचे खरे आडनाव गायकवाड आहे.

चौथी अशी शक्‍यता वाटते की, त्यांनी अध्यात्मिक राजकारण करू असे सांगितले होते, मात्र त्यांच्या आजच्या घोषणेमुळे अध्यात्मिक राजकारण गाठोड्यात बांधलेले राहील.

पाचवी शक्‍यता अशी वाटते की, सध्या रजनीकांत यांचे वयवर्षे 70 ऐवढे आहे. त्यातच त्यांना रक्‍तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे राजकारणात सक्रिय राहता येईल का, असाही प्रश्‍न असावा.

खरे तर या सर्व शक्‍यता आहेत. राजकारणात न येण्याचे खरे कारण दस्तुर खुद्द रजीकांतच सांगू शकतात. त्यांच्या स्पष्टीकरणाचे चाहते वाट पाहत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.