कराची – ग्वादर भागात चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत चीनच्या नौदलाचा तळ आणि डीप सी पोर्टचे काम सुरू असून यावरून बलूच नागरिकांत खदखद आहे. तोच रोष व्यक्त करत त्यांनी चीनच्या चार जणांना गेल्या काही दिवसांत लक्ष्य केले आहे. इतकेच नाही तर अलिकडच्या काळात बलूचींनी पाकिस्तानी लष्कराच्या सात सैनिकांना ठार मारले असल्यामुळे इम्रान खान सरकारचे टेन्शन वाढले आहे.
बलूचांच्या वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने ग्वादर परिसरात तारांचे काटेरी कुंपण घालण्याचे काम सुरू केले आहे. सरकारकडून अशी तयारी केली जात असल्यामुळे बलूचांनीही आपली रणनिती बदलली असून त्यांनी आता इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत केली जाणारी गुंतवणूक आणि चीनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
मंगळवारीच कराचीच्या बाह्य भागात असलेल्या एका कार शोरूममध्ये एका चीन नागरिकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला लक्ष्य करण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यातून ते दोघे बचावले असले तरी त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सरकारपुढेही पेच निर्माण झाला आहे. अन्य एका घटनेत कराचीच्या पॉश भागातील एका रेस्टॉरंटबाहेर उभी करण्यात आलेली एका चीनी नागरिकाची कार स्फोटाद्वारे उडवण्यात आली. सिंधुदेश रिव्हॉलूशेनरी आर्मी या संघटनेने या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
चीनची पाकिस्ताना 150 अब्ज डॉलरची गुंतवणूक
चीन आर्थिक कॉरीडॉरच्या माध्यमातून या भागात 150 अब्ज डॉलर्सची गंतवणूक करत असून त्याकरता आमच्या जमीनी बळजबरीने बळकावल्या जात आहेत. त्याकरताच त्यांना लक्ष्य करण्यासाठी आमचे हल्ले सुरूच राहतील असे सिंधुदेश आर्मीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आर्थिक कॉरीडॉर अर्थात सीपीईसी ही चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे चीनचा सागरी मार्ग निर्धोक होणार आहे. मात्र बलूच लोक या योजनेला विरोध करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील नैसर्गित साधन संपत्तीची लूट सुरू असून त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोकांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.
पाकिस्तानचा एक प्रांत असलेल्या बलूचिस्तानच्या सीमा अफगाणिस्तान आणि इराणशी थेट जोडल्या असल्यामुळे सामरिक दृष्ट्या हा भाग पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे. सीपीईसीचा प्रमुख भाग याच प्रांतातून जात असल्यामुळे बलूचींकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान अथवा चीनला येथे काही करण्यास मर्यादा येणार आहेत.