मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे नव्याने शिवसेना उभारण्यासाठी तयारी लागले आहेत. अशातच शिवसेना पक्षाने (शिंदे गट) उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश झाला.
दरम्यान, सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममध्ये काम केलं होतं, तसंच ते 2014 च्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये आणि महाविकासआघाडी सरकारमध्येही उद्योगमंत्री होते. विधान परिषदेचे आमदार असलेल्या सुभाष देसाई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेने त्यांना पुन्हा आमदारकी दिली नाही.
सुभाष देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांच्या मुलानेच शिंदें गटात प्रवेश केल्यामुळे हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.