‘या’ राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना बरे झाल्यानंतर दोन महिन्यांत करोनाने पुन्हा गाठले!

शिमला – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट प्रचंड घातक ठरली. रुग्णसंख्येचा झालेला विस्फोट आरोग्य यंत्रणांचे कंबरडे मोडणारा ठरला. मात्र आता विषाणू संसर्गाची लाट ओसरू लागली आहे. बाधितांची संख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी या विषाणूचा धोका अद्याप कायम आहे.

अशातच आज एक चिंताजनक बातमी हाती असून यानुसार हिमाचल प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना करोना विषाणूची दुसर्यांना बाधा झाली आहे.

हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांना करोना विषाणूची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी सिंग यांना यावर्षी १३ एप्रिलला करोना बाधा झाली असल्याचं आढळून आलं होत. ते त्यातून बरेही झाले होते. मात्र त्यांची आज करोना चाचणी करण्यात आल्यानंतर ते पुन्हा एकदा बाधित झाले असल्याचं समोर आलंय.

याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली असून त्यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी, रक्तदाब व अन्य चाचण्या केल्या असता सर्व सामान्य असल्याचं सांगण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, विषाणूची दुसऱ्यांदा बाधा होण्याचे देशातील प्रमाण अत्यल्प आहे. मात्र काही जणांमध्ये विषाणूच्या बाधेतून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा बाधा होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने करोना विषाणू संसर्ग होऊन गेल्यानंतरही काळजी घेणं आवश्यकच असल्याचे अधोरेखित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.