‘त्या’ नगरसेवकांना संविधान दिनाचाही विसर

पालिकेच्या कार्यक्रमास 22 पैकी 21 नगरसेवक गैरहजर

पिंपरी – ज्या संविधानाने नगरसेवक होण्याची, लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तेच नगरसेवक भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमास गैरहजर राहिले. प्रत्येक कार्यक्रमात पुढे-पुढे करणारे हे नगरसेवक संविधान दिनाच्या कार्यक्रमास न आल्याने हा विषय आज दिवसभर चांगलाच चर्चेचा ठरला.

भारतीय संविधान दिन कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बहुतांश नगरसेवक उपस्थित नव्हते. ज्या भारतीय संविधानामुळे आरक्षित जागेवर अनेक नगरसेवक फेब्रुवारी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले. आज ते पदाचा उपभोग ही घेत आहेत. त्यांना संविधान दिनी संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यास वेळ मिळाला नाही.

नगरसेवकांच्या या कृतीची शहरातून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. महापालिकेत राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या एकूण 22 आहे. त्यात भाजपचे 17, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. पालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.26) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना बहुतांश नगरसेवकांनी गैरहजेरी लावली.

पालिका भवनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच, पिंपरी चौकातील भीमसृष्टी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या वेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका शारदा सोनावणे, अश्‍विनी चिंचवडे आदी उपस्थित होते. आरक्षित जागेवरून विजयी झालेले भाजपचे बाबासाहेब त्रिभुवन हे एकमेव नगरसेवक कार्यक्रमास उपस्थित होते. उर्वरित 21 नगरसेवक संविधान दिनाच्या एकाही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या वतीने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
संविधान दिनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. संविधानामुळेच देशातील विविध जाती-धर्मांना मुख्य स्त्रोतामध्ये येण्याची संधी मिळाली. त्या संविधानाचा आदर सर्वच ठिकाणी आज करण्यात आला. मात्र ज्या संविधानामुळे लोकप्रतिनिधी झालेल्या तब्बल 21 जणांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साधे अभिवादनही केले नाही, त्या नगरसेवकांबद्दल चळवळीतील कार्यकर्त्यांमधून आज नाराजी व्यक्त करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.