मयूरभंज – ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्याची शिकारींनी हत्या केल्यानंतर केंद्राने वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे एक पथक राज्य यंत्रणेला मदत करण्यासाठी पाठवले आहे. सिमलीपाल दक्षिणच्या अप्पर बरहाकामुडा पर्वतरांगांतर्गत गमचाचरण जवळच शिकाऱ्यांनी इतर पाच अधिकाऱ्यांसह गस्त घालत असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. मठी हंसदा (वय 40) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.
सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रकाश चंद गोगिनेनी यांनी सांगितले की, माथी हंसदा यांच्या छातीत अनेक गोळ्या लागल्या आहेत. त्यांना करंजिया उपविभागीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याआधी 22 मे रोजी वनरक्षक बिमल कुमार जेना यांचीही शिकाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींची ओळख पटली आहे. या घटनेत वापरली गेली देशी बनावटीची बंदूकही जप्त करण्यात आली आहे. आता वन्यजीव संरक्षण कायदा आणि आयपीसी 302 अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून कठोर कारवाई केली जाईल.
भूपेंद्र यादव पुढे म्हणाले, “कर्तव्य करताना शहीद झालेल्या आमच्या योद्ध्याला गमावल्याने मला खूप दुःख झाले आहे. आम्ही त्यांच्या बलिदानाला सलाम करतो आणि मनापासून शोक व्यक्त करतो. केंद्र सरकारने या प्रकरणाची आधीच दखल घेतली आहे आणि राज्य यंत्रणेच्या मदतीसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे एक पथक पाठवले आहे.