आरिफ शेख
युक्रेनच्या वादातून अमेरिका-रशियादरम्यान तणाव वाढत आहे. अमेरिकी राष्ट्रपती बायडेन व रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दरम्यान नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दोन तास चर्चा झाली. त्यात बायडेन-पुतीन यांनी चक्क परस्परांना धमकावल्याचे वृत्त आहे.
मागील काही दिवसांपासून रशिया व युक्रेनदरम्यान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून अमेरिका व रशियादरम्यान चांगलाच तणाव वाढला आहे. तो निवळण्यासाठी आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. तीत आशादायी काही घडले नाही. पुतीन हे भारत दौऱ्यावरून मायदेशी परतल्यावर त्याच सायंकाळी बायडेन व पुतीनदरम्यान प्रदीर्घ चर्चा झाली.
ती दोन तास चालली. याचे वार्तांकन न्यूयार्क टाइम्सने प्रसिद्ध केले आहे. उभय नेत्यांत झालेल्या चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन होता. न्यूयॉर्क टाइम्सने बायडेन यांनी पुतीन यांना या प्रश्नी धमकावल्याचा मथळा दिला आहे. मात्र, या चर्चेचा तपशील पाहिला तर पुतीन यांनीदेखील बायडेन यांना धमकी दिल्याचे दिसते. युक्रेनचा हा वाद नेमका काय आहे, याची पार्श्वभूमी पाहावी लागेल.
1991 ला सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन पंधरा नवे देश अस्तित्वात आले. युक्रेन त्यापैकी एक देश. आधी तो सोव्हिएत युनियनचा भाग होता. स्वतंत्र देश झाल्यावर देखील रशियाची त्यावर नजर होतीच. 2014 साली पुतीन यांनीच युक्रेनच्या क्रिमिया या भूभागावर चक्क कब्जा केला. अमेरिका व युरोपीय समूहाने यावर खूप आकांडतांडव केले, मात्र पुतीन बधले नाहीत. “जी-8′ या बड्या देशांच्या समूहातून रशियाला बाहेर काढण्यात आले.
सात वर्षे हा विषय अधूनमधून धुमसत होता. आता नवा वाद सुरू झाला आहे, त्यास रशियाबरोबरच युक्रेनदेखील जबाबदार आहे. क्रिमियाला लागून असलेल्या युक्रेनच्या सीमेलगत दोन शहरे आहेत. दोनास्क व लोहान्स हा भाग भलेही युक्रेनच्या अखत्यारीत असेल, मात्र तेथील नागरिक रशियाच्या बाजूने आहेत. त्यावरून हा भाग क्रिमियात म्हणजे रशियात सामील करण्याचा पुतीन यांचा डाव असल्याच्या हालचाली आहेत.
रशियाने युक्रेनच्या सीमेवर युद्धसदृश तयारी केली आहे. केवळ रशिया-युक्रेनपुरता हा वाद नाही. यात अमेरिका व अन्य मित्र देशांनी उडी घेतली आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाची भीती होतीच, त्यापासून युक्रेनचा बचाव करण्यासाठी त्याला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे “नाटो’चे सदस्यत्व देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावरून पुतीन हे संतप्त झालेत. युक्रेन हा नाटोचा सदस्य होणे म्हणजे रशियाच्या दारावर अमेरिका व अन्य राष्ट्रांचे सैन्य उभे ठाकणे होय.
विषय इथेच थांबत नाही. युक्रेन जर नाटोचा सदस्य झाला तर रशिया त्यावर आक्रमण करण्याचे धाडस करू शकणार नाही. कारण नाटोच्या सदस्य देशावर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला. त्यातून उद्भवणारे परिणाम गंभीर असतील. पुतीन यांच्या आक्रमक वृत्तीला रोखण्यासाठी युक्रेनचा नाटोत समावेश करणे म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर होय.
बायडेन-पुतीन चर्चेदरम्यान हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. हा विषय चर्चेतून सोडवावा असे सुचविताना पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचे परिणाम आर्थिक व राजकीय निर्बंध लादण्यात होतील, हे बायडेन यांनी ठणकावले आहे. त्यास प्रत्युत्तर देताना पुतीन यांनी युक्रेनचा नाटो देशाच्या समूहात समावेश केल्यास आम्ही तेच करू जे आम्ही ठरविले आहे,
अशी उलट धमकी दिली आहे. म्हणजे रशिया युक्रेनवर आक्रमण करणार हा त्याचा अर्थ आहे. बायडेन यांनी रशिया-जर्मनी दरम्यान असलेल्या गॅस पाइपलाइनचा मुद्दा काढला. ही पाइपलाइन जर्मनीवर दबाव टाकून रोखून धरू, असे बायडेन यांचे मनसुबे दिसतात.
या सर्व वादादरम्यान रशियाने मिनीस्क ऍग्रिमेंटचे पालन करावे, असे बायडेन यांनी सुचविले आहे. पुतीन यांनी ही मागणीदेखील धुडकावली आहे. पुतीन यांनी क्रिमिया गिळंकृत केल्यावर 1914-15 मध्ये बेलारूसची राजधानी मिनीस्कमध्ये रशिया, युरोपीय महासंघ, बेलारूस, युक्रेन यांनी एकत्र येऊन करार केला होता. क्रिमियाची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, हे त्यात ठरले होते.
आता पुतीन या करारातून पळ काढण्याचे संकेत दिसताहेत. हा वाद वाढू नये म्हणून ओएसएसी (ओसाक) या 57 देशांच्या समूहाची तातडीची बैठक गत आठवड्यात झाली. पुतीन यांनी नाटोच्या विस्तारा विरोधात उपस्थित केलेला मुद्दा अनाठायी म्हणता येणार नाही. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकी-सोव्हिएत युनियनदरम्यान शीतयुद्ध सुरू होते. त्यातून अमेरिका समर्थक देशांच्या नाटो समूहाचा उदय झाला. प्रारंभी त्यात केवळ बारा देश सहभागी होते.
1991 ला सोव्हिएत युनियनचे विघटन झाले अन् वॉर्सा देशांचा समूह देखील विसर्जित झाला. त्यामुळे नाटो आपला विस्तार करणार नसल्याची ग्वाही 1991 मध्ये अमेरिकेने दिली होती. अर्थातच ती पाळली गेली नाही. आज नाटोची सदस्य संख्या एकतीसपर्यंत पोहोचली आहे. आता युक्रेनदेखील नाटोच्या दारावर उभा आहे. आपल्या दारावर नाटोचे आगमन त्यांना कदापि परवडणारे नाही. युक्रेनला नाटोत समाविष्ट केले तर आम्ही तेच करू जे आमच्या मनात आहे, ही पुतीन यांची धमकी प्रत्यक्षात आल्यास नवे संकट निर्माण होऊ शकते.