भारतावर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास; शेअर बाजारात 2.74 लाख कोटींची खरेदी

मुंबई, दि. 6- लॉकडाऊनच्या काळात इतर देशाबरोबर भारतातील उद्योग क्षेत्रावरही प्रचंड परिणाम झाला होती. मात्र अशा अवस्थेतही भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे असे परदेशी गुंतवणूकदारांना खात्रीने वाटते. म्हणूनच 2020-21 या वर्षात बराच काळ लॉकडाउन असूनही परदेशी पोर्टफोलिओ मधून भारतीय शेअर बाजारात तब्बल 2.74 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

या घडामोडीबदधल मंत्रालयाने समाधान व्यक्त केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था मुळात किती मजबूत आहे त्याचा प्रत्यय या गुंतवणुकीतून येतो, असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये फक्त एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात थोडीफार विक्री झाली. अन्यथा पूर्ण वर्षभर परकीय गुंतवणूक भारताच्या शेअर बाजारात येत होती.

सरकारचा पैसा अनावश्‍यक क्षेत्रावर वाया न जाऊ देता योग्य क्षेत्रांना मदत व्हावी अशा पद्धतीने सरकारने मदत दिली याची दखल गुंतवणूकदारांनी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजार आणि इतर व्यवस्था व्यवस्थित चालतील याची काळजी नियंत्रकांनी घेतली. गुंतवणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, परतावा पारदर्शक पद्धतीने दिला जावा यासाठी शेअर बाजारात डिजिटल व्यवस्था करण्यात आली.

यामुळे परकीय गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करणे कमालीचे सोपे झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेने 2021 -22 या वर्षाचा भारताचा विकास दर दहा टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त राहील असे सांगितले आहे. याचाही परकीय गुंतवणूकदारावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून येते असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.