वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. पुढच्या महिन्यातच तेथे नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यापूर्वीच ट्रम्प पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे काही काळासाठी ते उपाध्यक्षांकडे देशाचा कारभार सोपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे जर झाले तर उपाध्यक्षांनी अध्यक्षपदाचा कारभार पाहण्याची घटना त्या देशाच्या इतिहासात तिसऱ्यांदा घडणार आहे.
आपल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून लवकर बरे होण्यासाठी आपण क्वारंटाइन होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या घटनेच्या 25 व्या दुरूस्तीतील कलम 3 नुसार आपण आपल्या कर्तव्याचे निर्वहन करू शकत नसल्याचे नमूद करत पदभार तात्पूरत्या स्वरूपात उपाध्यक्षांकडे सोपवू शकतात.
1963 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येनंतर या स्वरूपाची दुरूस्ती घटनेत करण्यात आली होती. आता ट्रम्प यांनी तसा निर्णय घेतला तर ट्रम्प त्यांच्या पदावर कायम राहतील मात्र माइक पेन्स हे हंगामी अध्यक्ष ठरतील. त्यानंतर ट्रम्प यांना पुन्हा सूत्रे स्विकारायची असतील तर ते तसे लेखी स्वरूपात जाहीर करून पदभार स्विकारू शकतात.
दरम्यान, अध्यक्षांबद्दल अविश्वास निर्माण झाला तर अथवा कर्तव्याचे निर्वहन करण्यास ते अक्षम ठरत असतील तर त्यांचे मंत्रिमंडळ कलम 4 चा वापर करून त्यांना पदावरून दूर होण्यास सांगू शकते अशी तरतूदही या 25 व्या दुरूस्तीत करण्यात आली आहे. मात्र त्याचा आजपर्यंत वापर केला गेलेला नाही.
अध्यक्षांनी आपली सूत्रे उपाध्यक्षांकडे सोपवण्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात 13 जुलै 1985 रोजी दुसऱ्यांदा घडली होती. तेव्हा रोनाल्ड रेगन अध्यक्ष होते. त्यांनी आपण कर्तव्य बजावू शकत नसल्याचे पत्र लिहिले होते. त्यावेळी एच. डब्लू. बुश अमेरिकेचे हंगामी अध्यक्ष झाले होते. मात्र ते केवळ सकाळी साडेअकरा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत असे आठच तास अध्यक्ष होते. त्यानंतर रेगन यांनी पुन्हा कार्यभार हाती घेतला होता.
29 जून 2002 रोजी तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी कलम 3 चा उपयोग करत आपले अधिकार उपाध्यक्ष डिक चेनी यांच्याकडे सोपवले होते. चेनी सकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनउपर्यंत हंगामी अध्यक्ष होते. 21 जुलै 2007 रोजी बुश यांनी पुन्हा चोविस तासांसाठी चेनी यांच्याकडे कमान सोपवली होती.