नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीने सुसज्ज अशी दोन विमाने खरेदी करण्यात आली आहेत. यातले एक विमान पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास आज दाखल होत आहे, तर दुसरे वर्षाच्या अखेरपर्यंत येणार आहे.
जाणून घेउयात या विमानाची खास वैशिष्ट्ये : –
एअरफोर्स वनसारखीच रचना :
अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा गरजा ध्यानात घेत या विमानांची रचना करण्यात आली आहे. साधारणत: अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या एअरफोर्स वन प्रमाणेच याचे स्वरूप असणार आहे. याचे सगळ्यांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा हवेतच असताना कमांड सेंटर म्हणून वापर करता येणार आहे. त्यांची संचार यंत्रणा कोणीही हॅक करू शकणार नाही अथवा टॅपही करू शकणार नाही. महत्वाच्या व्यक्तींसाठी यात स्वतंत्र आरोग्य कक्ष असेल तसेच प्रसारमाध्यमांच्या व्यक्तींना सोबत नेण्याचीही विशेष व्यवस्था यात असणार आहे.
शत्रूच्या रडारवर दिसणार नाही :
या विमानात स्वसंरक्षण प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शत्रूच्या रडारचे सिग्नल जॅम करण्याची याची क्षमता असेल. क्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाला तर त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचीही याची क्षमता असेल. हे सगळे स्वयंचलित पध्दतीने पार पडेल व त्यासाठी कोणत्याही मनुष्यबळाची गरज भासणार नाही.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारचा क्षेपणास्त्र हल्ला झाला तरी विमानात असणाऱ्या व्यक्तीला आपला बचाव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या विमानाला कोणता धोका निर्माण झालाच तर यात बसवलेले क्षेपणास्त्र विरोधी संवेदक भारतीय हवाईदलाला याची पूर्ण माहिती पोहोचू शकेल. ज्या क्षेपणास्त्रापासून धोका होता ते नष्ट करण्यात आल्याची माहिती पायलटला तात्काळ समजू शकेल.
या विमानात ज्या काही आधुनिक सुरक्षा यंत्रणा असतील त्यांच्या कार्यान्वयनाची जबाबदारी भारतीय वायुसेनेकडेच असणार आहे.