- दोनशे रुपयांसाठी तरुणीला धमकावले
पुणे – सिग्नलला थांबल्यावर एका तरुणीच्या कारमध्ये कोयताधारी व्यक्ती बसला. त्यांने संबंधीत तरुणीला धाक दाखवत अर्धातास कार फिरवत दोनशे रुपयांची मागणी केली. तरुणीने एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा करत कारमधून बाहेर पडत पळ काढला. ही घटना 27 सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास कोथरुड ते चांदणी चौक परिसरात घडली. याप्रकरणी देवर्षी जोशी (वय 22) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
देवर्षी भुसारी कॉलनीत राहायला आहेत. एका खासगी कंपनीत त्या काम करतात. त्या 27 सप्टेंबरला मित्रांना भेटण्यासाठी कोथरुडमधील मोरे विद्यालयाजवळ गेल्या होत्या. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्या कारमधून घरी जात होत्या. त्यावेळी भारतीनगर परिसरात सिग्नल लागल्यामुळे देवर्षी यांनी कार थांबविली. त्याचवेळी मोटारीच्या डाव्याबाजूने एक तरुण त्यांच्या गाडीत बसला. त्याने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून यु-टर्न घेण्यास सांगितले.
त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी यु-टर्न घेतला. हातात कोयता असलेल्या तरुणाने देवर्षी यांना सुमारे अर्धातास कोथरुडमध्ये फिरविले. त्यानंतर त्याने मोटार चांदणी चौकात नेण्यास सांगितली. दरम्यान, त्याने देवर्षी यांना पैसे मागितले. त्या एटीएममधून पैसे काढून देते असे सांगत गाडीची चावी घेऊन खाली उतरल्या.
यानंतर चांदणी चौकातील एका भेळीच्या दुकानात पळ काढत त्यांनी नागरिकांकडे मदतीची मागणी केली. हे बघता कोयताधारी तरुणाने मोटारीतून पळ काढला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.