शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त व्याख्यान
पुणे – “नागरित्व सुधारणा कायदा (सीएए) गेली 70 वर्षे प्रतिक्षित ठेवण्यात आला. परिणामी, शेजारच्या देशांतील लाखो निर्वासित भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. महिलांना अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. यापुढे कोणत्याही हिंदू नागरिकांवर अन्याय होऊ नये आणि शरणार्थींना भारतीय नागरित्व मिळावे, यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. जे गेल्या 70 वर्षात होऊ शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी करून दाखवत आहेत, असे मत भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
शिवसमर्थ प्रतिष्ठान आणि मृत्यूंजय अमावस्या विचारमंच यांच्या विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त देवधर यांचे “सीएए : आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटक राजेश पांडे, नगरसेविका मंजुषा नागपुरे, बाबा मिसाळ, संयोजक दीपक नागपुरे, निलेश भिसे आदी उपस्थित होते.
देवधर म्हणाले की, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्येच हा कायदा लोकसभेत संमत झाला होता. या कायद्याचा मसुदा तयार करण्याआधी अनेक फिल्ड व्हिजिट्स झाल्या, तसेच मोठा अभ्यास केला गेला. नोटबंदीमुळे दहशतवादाचे कंबरडे मोडले.
काश्मीरवगळता देशाच्या इतर कोणत्याही भागात मोदी सरकारच्या कारकीर्दीत दहशतवादी हल्ला झाला नाही. त्यामुळे हिंदू समाज सहिष्णू आणि शांतताप्रिय आहे. या समाजाला कोणीही सहिष्णुतेचे धडे देण्याची गरज नाही, असा टोलाही यावेळी देवधर यांनी यावेळी कॉंग्रेसला लगावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक नागपुरे यांनी केले.’ सूत्रसंचालन प्राज भिलारे, तर नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी आभार मानले.