मांगल्यमय गणेशोत्सवासाठी

गणपती हा सकलजनांचा अधिपती. म्हणूनच गणरायाच्या स्वागतामध्ये काहीही कमतरता ठेवत नाही. सध्याच्या काळामध्ये आपण गणेशोत्सव हा पर्यावरण सुसंगत बनवणं गरजेचं आहे. गणेशोत्सवाच्या या माध्यमामधून सगळ्यांना एकत्र आणणे, हा प्रमुख उद्देश होता. हा उद्देश बऱ्याच प्रमाणामध्ये साध्य झाला आहे.

सध्याच्या काळामध्ये आपण गणेशोत्सव हा पर्यावरण सुसंगत बनवणं गरजेचं आहे. मुळात, कुठलाही सण हा निसर्गाच्या जवळ नेणारा असतो. यामुळे गणेशोत्सवामध्येही काही बदल करणं आपल्या सोयीचं आहे. उदाहरणार्थ, गणेश मूर्तींचं नदीतच विसर्जन करण्याचा आग्रह अनेक जण धरतात. वास्तविक, मूर्तीचं पाण्यात विसर्जन होणं गरजेचं आहे. मग हे पाणी नदीचं असो, समुद्राचं असो वा कृत्रिम हौद आणि तलावाचं असो, काहीही फरक पडत नाही. विषारी रंग पाण्यात मिसळले, तर ते पाणी थेट पिणाऱ्या जीवांना त्याचा धोका उद्‌भवू शकतो. शेवटी माणूस निसर्गावर सर्वाधिक अवलंबून असल्यानं निसर्गातील बदलांचा पहिला फटका आपल्यालाच बसतो. यामुळे याची काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळं गणेश मूर्ती ही मातीचीच असणं आवश्‍यक आहे. “पार्थिव मूर्तीचं पूजन करणे’ शास्त्रात सांगितलं आहे. म्हणूनच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नयेत.

गणेशमूर्तीच्या देखाव्यासाठी सजावट करताना थर्माकोल किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या
कुठल्याही घटकाचा वापर टाळावा. पाणी प्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणालाही आळा घालणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच गणेशोत्सवामध्ये ध्वनिवर्धकांचा वापर टाळावा. याबाबत जे सरकारी नियम केले गेले आहेत, त्याचं पालन करावं. सार्वजनिक आणि घरगुती दोन्ही गणपतीच्या मूर्तींच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न आणि स्वच्छ असावे. दररोज तयार होणारं निर्माल्य जमा करून त्याचा उपयोग खत
निर्मिती, रंग निर्मिती किंवा अशा उपयोगांकरता करावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.