संगमनेर – मागील शनिवारी संगमनेर शहरातील मध्यभागी मोमीनपुऱ्यात करोनाचा रुग्ण आढळला होता. आज शहरातील रंगारगल्ली शेजारील साळीवाड्यात करोनाने शिरकाव केल्याने संगमनेरकर चांगलेच धास्तावले आहेत. मटका किंगच्या संपर्कातून साळीवाड्यातील चाळीस वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली असून, मोमीनपुरा आणि नाईकवाडपुरा येथे प्रत्येकी एक, असा करोनाचा रुग्ण सापडला आहे. तसेच दोडी (ता. सिन्नर) येथील एकाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्यने तालुक्यातील बधितांची संख्या 61 वर पोहचली आहे.
मागील शनिवारी (दि. 30) रोजी संगमनेर शहरातील बाजारपेठ असणाऱ्या मोमीनपुऱ्यात करोनाचा रुग्ण सापडल्याने मोठा धक्का बसला होता. एकाच दिवशी सात रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यात आज (दि. 6) शहरातील मध्यवर्ती भागात रंगारगल्ली शेजारच्या साळीवाडा परिसरात आणखी एक रुग्ण सापडला. तसेच मोमीनपुऱ्यात 65 वर्षीय, तर नाईकवाडपुऱ्यात 63 वर्षीय महिलेलाही करोनाचे संक्रमण झाले आहे. त्यासोबत सिन्नर तालुक्यातील दोडी येथील 59 वर्षीय इसमाचाही करोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.
30 मार्च रोजी शहरातील मोमीनपुऱ्यात करोनाने शिरकाव केल्यानंतर या शनिवारी साळीवाडा भागात शिरकाव केल्याने संगमनेरकरांमध्ये चिंता वाढू लागली आहे. दोडी (ता. सिन्नर) येथील इसमाने देखील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन स्राव दिल्याने त्याचा अहवालही संगमनेर तालुक्यात गणला जाणार आहे. त्यामुळे संगमनेर शहराची करोना बधितांची संख्या 33, तर तालुक्यातील 28 झाली आहे.