दि. 1 जूनपासून प्रवाशांची गैरसोय टळण्याची चिन्हे
पुणे – लॉकडाऊन-4 मध्ये देशातील रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे. आता रेल्वे बोर्डानेदेखील रेल्वे स्थानकांवरील विविध दुकाने सुरू करण्याला देखील हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.
करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवरी दि.1 जूनपासून देशात सुमारे 200 रेल्वे गाड्या धावणार आहेत. परिणामी, स्टेशनवर प्रवाशांची ये-जा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात रेल्वे स्थानकावरील केटरिंग आणि वेंडिंग युनिट सुरू करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.
फूड प्लाझा, खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने, बुक स्टॉल, औषधांची दुकाने आदींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये मात्र रेस्टॉरंट, फुड प्लाझामध्ये थांबण्याची आणि बसून खाण्याची सुविधा असणार नाही. त्यामुळे स्टेशनवरील खाद्यपदार्थांची दुकाने सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाने देखील संबंधित कंत्राटदार, खाद्य पदार्थ व्यावसायिक आदींना आदेश दिले आहेत. याशिवाय प्रवासी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
पुणे स्टेशनवर 14 स्टॉल्स सुरू होणार
पुणे विभागातील लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या पुणे स्टेशनवरील सुमारे 14 स्टॉल्स “इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’मार्फत (आयआरएसडीसी) चालवण्यात येत आहेत. याबाबत स्टॉलधारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
विक्रेत्यांना सूचना
– स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे
– सॅनिटायझरची व्यवस्था असावी
– व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क, हातमोजे वापरणे बंधनकारक
– प्रवाशांनी देखील शारीरिक अंतर ठेवून खरेदी करावी
– कमीत कमी कर्मचाऱ्यांनी काम सुरू करावे
– कोणीही कर्मचारी आजारी नसावा