पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गासाठी केंद्र सरकारकडून सात ठिकाणची एकूण 9 हजार 579 चौरस मीटर जागेपैकी फक्त दोन ठिकाणच्या जागा ताब्यात आल्या तर, राज्य शासनाकडून 13 ठिकाणच्या 15 हजार 378 चौरस मीटर जागांपैकी सात ठिकाणच्या जागेचा ताबा पीएमआरडीएला मिळाला. उर्वरित जागेचा ताबा मिळवण्यासाठी पीएमआरडीएचा पाठपुरावा सुरू आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोमार्ग 23 किलोमीटरचा असून त्यावर 23 स्टेशन असणार आहे. हा मेट्रो मार्ग पीपीपी तत्वावर उभारण्यात येत आहे. शिवाजीनगर येथील खादी व ग्राम उद्योग या संस्थेकडील 194 चौरसमीटर व वेधशाळा (सिमला ऑफिस)ची 464 चौ.मी या दोन ठिकाणच्या जागा ताब्यात आल्या आहेत. तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या संस्थेची 7 हजार 235 चौ.मी जागा मागणीचा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर आकाशवाणी संस्थेच्या आवारातील 317 चौ.मी जागेची तांत्रिक स्थळ पाहणी करून हा प्रस्ताव मुख्यालयास सादर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय कृषी अनुसंधान केंद्रामधील 487 चौ.मी जागा देण्याबाबत दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडून सकारात्मक अहवाल आलेला आहे. शिवाजीनगर येथील एलआयसी संस्थेची 408 चौ.मी जागा 90 वर्षे भाडेकराराने आणि बाजारमूल्याप्रमाणे मोबदल्याची रक्कम मिळण्याच्या अटीवर हस्तांतरणासाठी सकारात्मक आहे. तर आरबीआयची 470 चौ.मी जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे.
तर राज्य शासनाकडील कृषी महाविद्यालयाची 197 चौ.मी जागेचा आगाऊ ताबा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तर जिल्हा व सत्र न्यायालयाची 3 हजार 410 चौ.मी जागा मिळण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार सुधारित आराखडे व भूसंपादन प्रस्ताव विधी विभागास सादर करण्याची कार्यवाही चालू असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.