प्रशासनाला दिलेली मुदत संपली; आज कराडमध्ये एल्गार
कराड : गेल्या अडीच वर्षांपासून कराड जनता बॅंकेवर आर्थिक निर्बंध आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदार मेटाकुटीला आले आहेत. ठेवी परत मिळाव्यात म्हणून ठेवीदारांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्याचा एक भाग म्हणून उद्या, दि. 24 रोजी बॅंकेच्या मुख्यालयासमोर हजारोच्या संख्येने ठेवीदार पुन्हा एकवटणार आहेत.
ठेवीदारांनी दि. 12 रोजी कराड जनता बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर जाऊन बॅंक प्रशासनाचा निषेध करत अध्यक्ष व संचालक मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. राज्य सरकारला व बॅंक प्रशासनाला विकास पाटील, राजेंद्र पाटील व शेकडो ठेवीदारांनी दि. 23 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता.
ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी बॅंक प्रशासन व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, यासाठी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
या निर्णयासाठी ठेवीदारांनी दि. 23 तारखेपर्यंत राज्य सरकार व बॅंक प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता.
परंतू बॅंक असो वा सरकार यांनी कोणताच निर्णय न घेतल्याने उद्या, दि.24 रोजी सकाळी 11 वाजता कराड येथे बॅंकेच्या मुख्यालयासमोर हजारो ठेवीदार एकवटणार आहेत. ठेवीदारांच्यावतीने कराड तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणाची तयारी करण्यात आली आहे.
कराड जनता बॅंकेचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून हजारो सभासद व ठेवीदार सोमवारी कराडमध्ये दाखल होत आहेत. आंदोलकांनी जाहिरात फलक, घोषणा फलक तयार केले आहेत. कराड जनता बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, संचालक व कोणताही ठोस निर्णय न घेणाऱ्या सहकार खात्याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली जाणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली.