नवी दिल्ली – एलियन्स म्हणजेच परग्रहवासीय हा नेहमी चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय राहिला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठून ना कोठून सतत परग्रहवासीयांच्या बातम्या येत असतात. आता पेरू देशातील परग्रहवासयांच्या बातम्या समोर आल्या असून या देशामध्ये काही उडणारे एलियन्स नजरेस आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र या दाव्याचे खंडन केले असून पेरूमधील सोन्याच्या खाणीमध्ये तस्करी करणाऱ्या काही तस्करांनी या परग्रहवासीयांच्या अफवा पसरवल्या असाव्यात असा या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
पेरूमध्ये ज्या भागांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत त्या भागातील गावांमध्ये सध्या या अफवा पसरल्या असून सुमारे सात फुटापेक्षा जास्त उंची असणारे हे एलियन्स उडत उडत येतात आणि माणसांच्या चेहऱ्यावर हल्ला करतात असा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी या एलियनची छायाचित्रे सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या वेगाने पसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि शोध घेतला असता एलियनच्या पेहरावमध्ये काही सोन्याचे तस्करच हा कारनामा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.डेली मेल या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी कोठेही परग्रहवासीय नसून सोन्याची तस्करी करणारे तस्करच परग्रहवासीयांच्या वेशात येऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. अशी माहिती दिली आहे.
पेरूमधील ज्या प्रदेशांमध्ये परग्रहवासिय दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या भागामध्ये ईकीतु ही प्राचीन जमात राहते या जमातीतील काही मुलींचे अपहरण या परग्रहवासियांनी केले असा दावाही करण्यात येत आहे. या जमातीतील एका प्रमुखाने या परग्रहवासीयांवर गोळीबाराचाही कोणता परिणाम होत नसल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असता सोन्याच्या तस्करांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर काही गोष्टींचा वापर करून परग्रहवासीय सदृश काही आकृत्या निर्माण केल्या आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला पेरूमध्ये कोठेही एलियनचे दर्शन झाला नसल्याचा अधिकृत खुलासा आता पेरू सरकारनेही केला आहे.