नगर- शहरात वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांचा उच्छादामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले असून महापालिका प्रशासन यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांचे वाभाडेच काढले. एवढ्यावरच न थांबता थेट बैठकीतच अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार व टक्केवारी घेत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनीही महासभेत कुत्रे सोडण्याचे सोडण्याचा इशारा दिला. अखेर येत्या 28 ऑगस्टपूर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन दिल्याने नगरसेवक शांत झाले.
स्थायी समितीची बैठक सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. सभेच्या सुरुवातीसच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न रूपाली वारे, विनीत पाऊलबुध्दे व सुनील त्र्यंबके यांनी उपस्थित केला. मोकट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची निविदा तीन महिन्यांपूर्वी संपुष्टात आली, मात्र फेरनिविदाही काढली गेली नाही आणि महापालिकेकडूनही मोहीम राबवली जात नाही, हंगामी स्वरूपात इतर कोणालाही काम दिले गेले नाही. त्यामुळे कुत्रे, डुकरे आदी जनावरांचा शहरात सुळसुळाट झाल्याचा आरोप त्यांनी केला.
टक्केवारीच्या घोळामुळेच निविदा काढली गेली नाही, असा थेट आरोप पाऊलबुध्दे यांनी केला. निर्बीजीकरण न करताच बिले काढली जातात, असा आरोप संपत बारस्कर यांनी केला. सभापतींनी निवडणुका जवळ आल्या आहेत, मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा सामना नगरसेवकांना करावा लागत आहे, याकडे लक्ष वेधले. कोंडवाडा विभाग प्रमुख डॉ.सतीश राजुरकर सभेस अनुपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांच्या संताप आणखी वाढला. सभेच्या दिवशी अधिकारी कसे गैरहजर राहतात, अशीही विचारणा त्यांनी सभापती व अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे केली.
राजूरकर यांना कार्यमुक्त करण्याची मागणीही करण्यात आली. त्यांच्याकडून कोंडवाडा विभाग काढून घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच डॉ. राजुरकर बैठकीला हजर झाले. ते म्हणाले की, 30 जून रोजी संस्थेने काम बंद केले. त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव होता, मात्र संस्थेनेच काम नाकारले. शहरात सुमारे 25 हजारावर मोकाट कुत्री आहेत. त्यातील 13.5 हजार कुत्र्यांची निर्बीजीकरण करण्यात आले. हे प्रमाण निम्मेही नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. आठ दिवसात मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास उपोषणाचा इशारा पाऊलबुदे यांनी दिला. अखेर यासाठी 28 ऑगस्टपर्यंत अधिकाऱ्यांना मुदत देण्यात आली.
कुत्र्यांची प्रतिकृती अधिकाऱ्यांना भेट
मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले रस्त्यावर खेळू शकत नाहीत. रात्री अपरात्री वाहनचालकावर हल्ले केले जातात, पूर्वी वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुत्र्यांच्या दहशतीने लहानपण पिंजऱ्यात कैद झाले आहे असा आरोप करीत रुपाली वारे, पाऊलबुध्दे व त्र्यंबके यांनी उपायुक्त बांगर यांना कुत्र्यांची प्रतिकृती भेट दिला.