पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद
तालुक्यात पावसाचा पुन्हा जोर
पाटण – पाटण तालुक्यात सर्वत्र गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी जाणवत असताना पुन्हा शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यातील पुर परिस्थिती व झालेल्या अतिवृष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी पाटण तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावून त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, अद्याप, पाटण तालुक्यावर अतिवृष्टीचे संकट टळलेले नसून पावसाचा जोर पुन्हा वाढता आहे. जोरदार पावसामुळे पाटण तालुक्याच्या पश्चिमेकडील कोयना, मोरणा आणि ढेबेवाडी खोऱ्यातील गावे अतिवृष्टीमुळे चांगलीच बाधित झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाटण तालुक्याच्या सीमेलेगत असणाऱ्या चांदोली आणि कोयना अभयारण्यात सातत्याने अतिवृष्टी सुरू असून शनिवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे दुर्गम गावातील जनता घराबाहेर पडले नाहीत. तालुक्यातील कोयना, मोरणा, केरा, तारळी, काफना या नद्या दुथडी भरून वाहत असून इतर नदी, नाले, ओढे यांना पूर आहे. त्यामुळे पाटण शहर व आसपासची गावे शनिवारी चांगलीच गारठलेली दिसून आली. रस्त्यावर वाहने आणि लोकांची तुरळ वर्दळ होती. तालुक्याच्या पूर्वेकडील नवारस्ता, मल्हारपेठ, मारूलहवेली, नावडी, विहे, उरुल, बहुले, गारवडे आदी. भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. याउलट पश्चिमेकडील कोयना, मोरणा व चाफळ मणदुरे, ढेबेवाडी परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी जाणवत आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम गावांचा संपर्क तुटला
तालुक्यात कोयना व चांदोली अभयारण्याच्या सीमेवरील काही गावात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यास लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल होते. वीज आणि दूरध्वनी यंत्रणादेखील कुचकामी ठरते. यामध्ये मोरणा खोऱ्यातील पांढरेपाणी, हुबरणे, पिनीचा वाडा, आटोली, तसेच कोयना भागातील घाटमाथ्यालगत वसलेली गावे आणि ढेबेवाडी भागातील निवी कसणी यासारख्या अनेक गावांचा अतीवृष्टीमुळे संपर्क तुटला आहे.
प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाट
शुक्रवारी रात्रभर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे, तसेच शनिवारीही पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवन चांगलेच गारठले. शनिवारी पाटण, मोरगिरी, मल्हारपेठ, कोयना, ढेबेवाडी येथील बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट जाणवला.
पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग
संततदार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील प्रमुख भात पीक आणि त्याच्या लागणीने चांगलाच वेग घेतला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील शेतकरी महिला पुरुषवर्ग भात लागणीसाठी दिवसभर शेतात राबवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.