बंगळुरू – अक्कलकोट – गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत अहमदनरचे असून ते गाणगापूर येथे दर्शनासाठी आले होते. देव दर्शनाहून परतताना हा अपघात घडला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून हा भीषण अपघात आज दुपारी तीनच्या सुमारास झाला. मृतांमध्ये चार महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील भाविक कर्नाटकातील गाणगापूरला दर्शनासाठी आले होते. गाणगापूरहून अक्कलकोट मार्गे अहमदनगरला परत जात असताना कर्नाटकमधील बळोरगी गावाजवळ चालकाचा गाडीवरून ताबा सुटला. त्यामुळे गाडी झाडाला आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून कर्नाटकातील अफझलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
जखमी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, देव दर्शनाहून परत येत असतानाच काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.