मुंबई – अमेरिकेतील महागाई 40 वर्षाच्या उच्चांकावर गेली आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा पेचात अजून संपुष्टात आलेला नाही. या कारणामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण होते. मात्र तरीही भारतीय शेअर बाजारात बरीच खरेदी होऊन शेअर निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 55,550 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 35 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 16,630 अंकांवर बंद झाला.
औषधी क्षेत्रातील कंपन्या आज तेजीत होत्या. सन फार्मा कंपनीचा शेअर 4 टक्क्यांनी वाढला. त्याबरोबरच आयटीसी, पावर ग्रिड, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र नेस्ले, मारुती, एनटीपीसी, ऍक्सिस बॅंक, टाटा स्टील कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यांपर्यंत घट झाली.
जागतिक बाजारात आज नकारात्मक वातावरण होते. कारण अमेरिकेतील महागाई 40 वर्षाच्या उच्चांकावर आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, सरलेल्या आठवड्यांमध्ये शेअर निर्देशांकामध्ये सव्वा दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
मात्र जागतिक परिस्थिती अजूनही लवचिक आहे. ती जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत शेअर बाजार निर्देशांकांना दिशा मिळणार नाही. आज स्मॉल कॅप 0.9 टक्क्यांनी तर मिड कॅप 0.45 टक्क्यांनी वाढला. पुढील आठवड्यात ही शेअर बाजार निर्देशांक कमी अधिक प्रमाणात अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.