सातारा -जिल्ह्यात चार तालुक्यांतील 27 गावांमध्ये लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव असून आतापर्यंत उपचारादरम्यान पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. 27 गावांमधील 149 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली असून 49 जनावरांवर उपचार करुन ती बरी झाली आहेत. 30 हजार 600 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
वाघेरी (ता. कराड) येथे लंपी स्किन रोगाची सुरुवात झाली. कराड, फलटण तालुक्यानंतर सातारा तालुक्यात महिगाव, पांढरवाडी येथे बाधित जनावरे आढळली. वाघेरीत 11, फलटण तालुक्यात खामगाव 3, जिंती 13, फडतरवाडी 3, चव्हाणवाडी 6, पाडेगाव 6, सोनवडी 8, कुरवली बुद्रुक 7, धुळदेव 1, फरांदवाडी 4, आसू 7, हनुमंतवाडी 7, गिरवी 2, डोबाळवाडी 1, सातारा तालुक्यात कोडोली (पांढरवाडी) 8, महागाव 11, खटाव तालुक्यात अनपटवाडी 22, मानेवाडी 5,
मोराळे 5, धोंडेवाडी 5, राजापूर 2, खटाव 2, कलेढोण 1, कटगुण 1, गणेशवाडी औंध 2, निमसोड 2, पडळ 4 अशा 27 गावांमध्ये 149 बाधित जनावरे आढळली आहेत. वाघेरी एक, जिंती, सोनवडी, हनुमंतवाडी (तिन्ही ता. फलटण) येथे प्रत्येकी एक, मानेवाडी (ता. खटाव) येथे एक अशा पाच जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. गुरुवारअखेर 30 हजार 600 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीचा साठा शिल्लक आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.