सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1568 झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांचे प्रमाण घसरत असताना करोनाबळींची संख्या कमी होत नव्हती. ती संख्या थोडी कमी झाल्याने प्रशासनावरील ताण काहीसा हलका झाला आहे; परंतु करोनाबळी होऊच नयेत म्हणून ठोस उपायांची गरज आहे. डॉ. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना कोपर्डे, ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील 55 वर्षीय पुरुष, राणंद, ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष, भोसे, ता. कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष, खिंडवाडी, ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, अशा पाच कोविडबाधितांचा मृत्यू झाला.