नगर -लॉकडाऊन कालावधीतील आरोग्य विषयक चर्चासत्राचे आयोजन डॉक्टर्स सोसायटीच्यावतीने करण्यात आले होते. या चर्चासत्राचा सुमारे पाच हजार पेक्षा जास्त नगरकरांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती नगर डॉक्टर्स सोसायटीचे अध्यक्ष दंतचिकित्सक डॉ.सुदर्शन गोरे यांनी दिली.
मागील दोन महिन्यांत लॉकडाऊन कालावधीत दैनंदिन आरोग्य कसे राखावे, झुम ऍप, फेसबुक, यु-ट्युब या माध्यमांच्या सहाय्याने विविध विषयांवरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या संदर्भातील 11 भागांमध्ये नगरकरांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आरोग्य राखण्याचा प्रयत्न नगरकरांनी केला. डॉ. महेश कोकाटे यांनी करोना व त्यावरील होमिओपॅथिक उपचार पद्धती व सारी आजार यावर मार्गदर्शन केले.