नवी दिल्ली- करोनाच्या औषध निर्माणासाठी देशातील ज्या 14 उमेदवारांवर प्रयोग सुरू आहेत, त्यापैकी चौघांची वैद्यकीय चाचणी पुढील 3-5 महिन्यात सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. संपूर्ण जग करोनावरील लस विकसित करण्यासाठी कार्यरत आहे, असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्याशी ऑनलाइन संवाद साधताना वर्धन म्हणाले.
करोनावरील लस शोधण्यासाठी 100 पेक्षा अधिक उमेदवारांवरील चाचण्या सध्या वेगवेगळ्या टप्प्यावर सक्रिय आहेत. या चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेच्या समन्वयाने घेतल्या जात आहेत. त्या कार्यात भारतही सक्रिय योगदान देत आहे. सध्या 14 उमेदवारांवर वेगवेगळ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. उद्योग, शिक्षण विश्व यामध्ये हातभार लावत आहेत आणि आमचे विज्ञान मंत्रालय अशा सर्व प्रयत्नांमध्ये जैव तंत्रज्ञान विभागास मदत करीत आहे. अशा कामासाठी आर्थिक सहकार्य आणि नियमित मंजूरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या ही प्रक्रिया वैद्यकीयपूर्व चाचणी अवस्थेत आहे. या 14 उमेदवारांपैकी चौघांवरील वैद्यकीय चाचण्यांना पुढील 3-5 महिन्यात सुरुवात होईल. हे औषध कधी तयार होईल, हे सांगणे अवघड आहे. मात्र किमान एक वर्षाचा कालावधी त्यासाठी लागू शकतो, असे वर्धन म्हणाले. तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर नागरिकांनी करावा, असेही ते म्हणाले. करोनावरील लस शोधण्याच्या कामासाठी “पीएम-केअर्स’ निधीतून 100 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लसीच्या विकासाचे पर्याय शोधण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाला केंद्रीय समन्वय एजन्सी बनविण्यात आले आहे.