र्मथुरा – उत्तरप्रदेशात गोवर्धन पर्वतराजीत काल पासून पाच दिवसांचा मुदिया पूनो उत्त्सव सुरू झाला. त्यात पहिल्या दिवसात झालेल्या परिक्रमेत पाच लाख भाविक सहभागी झाले होते. या यात्रेला मिनी कुंभ यात्रा असेही म्हटले जाते. 12 जुलै ते 16 जुलै या अवधीत ही यात्रा सुरू राहणार आहे. आज पहिली परिक्रमा तेथे पार पडली.
या परिक्रमेत भाविकांची संख्या वाढत जाणार असून ती जवळपास दहा लाखांच्या जवळपास जाईल अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी सतीश त्रिपाठी यांनी दिली. यंदापासून या ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांसाठी हेलिकॉप्टरद्वारे परिक्रमेची सोय करण्यात आली. तीन हजार रूपयांत ज्येष्ठांना ही सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी 7 सुपर झोन, 21 झोन, आणि 62 सेक्टर्सची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी येथे 15 सरकारी आणि 2 खासगी वैद्यकीय उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी 2500 पोलिस कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. परिक्रमा मार्गावरही 21 पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यात्रेकरूंसाठी रेल्वेनही जादा गाड्यांची सोय केली आहे.