नवी दिल्ली – प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. नरेश त्रेहान यांच्यासह अन्य काही जणांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंगचे प्रकरण दाखल केले आहे. गुरगावमध्ये मेदांता हॉस्पिटलसाठी भूखंड मिळवण्याचे हे प्रकरण आहे.
डॉ. त्रेहान हे या मेदांता हॉस्पिटलचे सहसंस्थापक आहेत. या हॉस्पिटलसाठी भूखंड मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब झाला असल्याच्या आरोपावरून गुरगाव पोलिसांनी डॉ. त्रेहान आणि अन्य 16 जणांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरनंतर “ईडी’ने गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण दाखल केले आहे आणि पोलिसांच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या सर्वांना आरोपी म्हटले आहे.
2004 मध्ये स्थानिक रहिवाशांना हटवून मेडिसिटी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याकामी अनियमितता झाल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशांवरून पोलिसांनी “एफआयआर’ दाखल केली होती. मात्र या प्रकरणातील आरोप खोटे असल्याचे मेदांता हॉस्पिटलने म्हटले आहे.