बंगळुरू – कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे कॉंग्रेस व जेडीएसचे प्रयत्न सुरूच असून त्यात एका आमदाराचे मन वळवण्यात कॉंग्रेसचे ट्रबल शुटर डी. के. शिवकुमार यांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. एमटीबी नागराज असे या आमदाराचे नाव आहे.
शिवकुमार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या आमदारीकीचे राजीनामे दिले आहेत. तथापी शिवकुमार आणि अन्य नेत्यांनी आमचे मन वळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. के सुधारकर राव यांच्याशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेईन त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. आम्ही अनेक दशके कॉंग्रेस मध्ये काम केले आहे याची आम्हालाही जाणिव आहे.
शिवकुमार यांनी म्हटले आहे की, नागराज यांनी पुन्हा कॉंग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे याच आम्हाला आनंद आहे. नागराज यांच्याबरोबरच सुधाकरराव या दोघांचे राजीनामे अजून सभापतींनी स्वीकारलेले नाहींत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही आमदार आहेत.
दरम्यान दोन्ही गटांतील आमदारांन बंगळुरू आणि महाराष्ट्रांतील काही हॉटेलांमध्ये ठेवण्यात आल्याने आज कर्नाटकातील राजकीय पटालावर काहीशी शांतता होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही काही काळ येथे जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरच पुढील घडामोडी ठरणार आहे.