नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प या नवी दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार असल्या तरी त्यांच्या या भेटीपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दूर ठेवण्यात आले आहे.
मेलेनिया ट्रम्प या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील आनंदी तासाला उपस्थित राहणार आहेत. या तासाची कल्पना आपच्या सीसोदिया यांनी मांडली होती. या तासाला मुलांच्या मानसिक विकासावर भर देण्यात येतो.
मेलेनिया ट्रमप या शाळेला भेट देतील त्यावेळी उपस्थित राहणाऱ्यांच्या नावांच्या अंतिम यादीतून केजरीवाल आणि सिसोदिया यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. प्राथमिक नियोजनानुसार सिसोदिया आणि केजरीवाल मेलेनिया यांचे स्वागत करतील, असे निश्चित करण्यात आले होते.
देशाच्या राजधानीतील शाळांचा दर्जा सुमार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये केला होता. त्या पार्श्वभूमीवर मेलेनिया ट्रम्प यांच्या दौऱ्यात या शाळेतील आनंदी तास या कार्यक्रमाचा समावेश गेल्या आठवड्यात करण्यात आला होता. अफगाणीस्तान आणि संयुत अरब अमिरात आणि अनेक आशियाई देशांच्या मंत्र्यांनी या आनंदी तासाची पाहणी केली आहे. त्यांनी या संकल्पनेचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात करावा, अशी सुचना केली आहे.