मुंबई – आज मुंबईमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास धारावी झोपड्पट्टीजवळील कमला नगर येथे मोठी आग लागल्याचे समोर आले. साधारणतः पंचवीसहुन अधिक घरांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रसांगवधान दाखवत तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.
या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या ठिकाणी काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागल्याची माहिती समजताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. यासोबतच अग्निशमन दलाचे तब्बल दहा बंब आग लागलेल्या ठिकाणी पोहचले.
आगीची भीषणता तीव्र होती. त्यामुळे आग वीजवण्यासाठी शमन दलाचे सर्व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाला या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब झाला यामुळे आग देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी देखील घटनास्थळी झाली होती.