कोविड रुग्णालयाला भीषण आग; 5 करोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद  – गुजरातमधील राजकोट शहरातील कोविड रुग्णालयाला आज सकाळच्या सुमरास लागलेल्या आगीमध्ये 5 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला ही आग लागली होती. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 26 अन्य रुग्णांना सुखरूप सोडवण्यात आले आहे. या रुग्णांना अन्य विभागांमध्ये हलवण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले.

राजकोटमधील आणंद बंगला चौक परिसरातील चार मजली उदय शिवानंद रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये मध्यरात्री 12.30 वाजता आग लागली. या रुग्णालयांमध्ये कोविड बाधित 31 रुग्णांवर उपचार सुरू होते, अतिदक्षता विभागातील 5 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

तर इतर दोघे दुसऱ्या रुग्णालयात हलवले जात असताना मरण पावले, या आगीमध्ये इतर कोणीही जखमी झाले नाही, असेही पटेल यांनी सांगितले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 4 लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

प्राथमिक तपासानुसार ही आग इमारतीच्या व्हेंटिलेटरमधील शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. या रुग्णालयाने आगीशी संबंधित “एअओसी’ आणि अन्य उपाययोजनाही केलेल्या आहेत. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांपैकी 5 जणंचा मृत्यू झाला आहे. अन्य मजल्यांमध्ये पसरण्यापूर्वीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, असे राजकोटचे पोलीस आयुक्‍त मनोज आगरवाल यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये अहमदाबादमधील चार मजली खासगी रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे आठ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.