पुणे – करोना पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांसाठी नियम घालून दिले आहेत. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांकडून पालन होताना दिसत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागांतील एकूण 47 हॉटेल व्यावसायिकांकडून 4 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली. या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पथके स्थापन केली.
या पथकामध्ये पोलीस, उत्पादन शुल्क, महसूल, महापालिका यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
पुणे शहरातील 27, पिंपरी-चिंचवडमधील 12 आणि ग्रामीण भागातील 8 हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्याचे तपासणीत आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.