आपल्या कामातच आनंद शोधा

सध्या मराठी गाणी ऐकण्याची वेळ- तीही रेडिओवर शहरात क्वचितच येते. पण मी आणि माझी पत्नी रोज संध्याकाळी “सांजधारा’ कार्यक्रम मात्र आवर्जून ऐकतो. त्यात बरीच जुनी गाणी ऐकता येतात, गाण्यांबरोबर गुणगुणता येतं. वेळ आनंदात जातो. पण तो वेळ क्षणिक आनंद देत नाही. त्या गाण्यांनी जुन्या आठवणी जाग्या होतातच, ते क्षण सोनेरी चंदेरी होतातच पण वाट पाहण्याचा अगोदरचा वेळ, नंतर काही काळ ती गाणी मनात गुंजत राहतात आणि पुन्हा आठवतात. त्यावेळी तेवढाच आनंद देतात.

केवळ गाणीच नाही तर साहित्य (कथा, कविता, कादंबरी आत्मचरित्र, ललित लेख) नाटक चित्रपट, नृत्य कोणतीही कला त्या क्षणापलीकडे आनंद देते. त्या कलेचा आस्वाद पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो, इतरांना तो शेअर करावासा वाटतो. या कला डोळ्यांचा, कानांचा असा विषय होतात, मन गुंगवून टाकतात. यावरून एक गोष्ट आठवली. एका राजानं दरबारात एका गायकाचं गाणं ठेवलं. तो गायक गाण्यापूर्वी म्हणाला, “मला तर रसिकांसमोर गायला फार आवडतं. पण माझी एक अट आहे. गाणं ऐकताना कोणी मान डोलावता कामा नये मान डोलली तर त्याला मारावे’.
राजानं सगळ्या दरबारात शिपाई विखरून ठेवले. तळपत्या तलवारी घेऊन- गाणं सुरू झालं. गाणं खूपच सुंदर होतं. आलाप, ताना, मुरक्‍या, तराणा लोक मान हलवत नव्हते, पण काही रसिक मात्र स्वतः विसरले माना डोलावू लागले, हात उंचावून “वा- वा’ अशी दाद देऊ लागले. अचानक गायक थांबला आणि राजाला म्हणाला, “आता फक्त गाणं ऐकताना माना डोलावत होते. त्यांना थांबवा- इतरांना जाऊ दे- मी फक्त त्या रसिकांसाठीच गाणं गाईल. कारण गाणं ऐकताना ज्यांची मान डोलू लागते, ते स्वतःला विसरून जातात हेच खरे रसिक.’

जगणं सुंदर व्हायचं असेल तर डोळे, कान, नाक, जीभ सगळेच तरल, जागे हवेत. नाटक, चित्रपट पाहणं चांगली पुस्तकं वाचणं हे डोळ्यांचं खाद्य आहे, गाणं ऐकणं हसवणारे- रडवणारे, चिंतन करायला लावणारे, जगणं बदलून टाकणारे संवाद ऐकणं, संगीत ऐकणं (बासरी, सतार, संतूर ही वाद्य ऐकून तर बघा) हे कानांचं खाद्य, कस्तुरीचा अत्तरांचा, ताज्या फुलाचा, नव्या पुस्तकांचा, दरवळणाऱ्या मसाल्यांचा वास येणं, मखमलीचा, बाळाच्या अंगाचा, लोकर-रेशीम अशा वस्त्रांचा स्पर्श होणं, चांगल्या चुंगल्या चवीचं- गोड आंबट तुरट खारट तिखट अशा सगळ्या चवी जीभेवर मिळणं या सगळ्यांनी जगणं समृद्ध होतं, परिपूर्ण होतं. अनुभवांनी परिपक्व होतं.

आपल्या कामात तन्मय होणं हेही जगणं आनंदी करतं. दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी एक गुरू लोहार आहे. भांडी तयार करताना समोरून वाद्य वाजवत राजाची मिरवणूक गेली तरी याचं लक्ष कामापासून ढळलं नाही. आपलं काम जास्त महत्त्वाचं मानून एकाग्रचित्तानं करत राहणं हे सुद्धा आनंदी जगणंच आहे. काम ते काम “काम’ उरतच नाही. ओशो म्हणतात, तीच देवाची पूजा होते. कबीर शेले विणत, रोहिदास पादत्राणे करत, सावतामाळी तर जन्मभरात कधीच विठोबाच्या दर्शनाला गेला नाही असं म्हणतात.

“कामात बदल हीच विश्रांती’ असं पंडित नेहरू म्हणायचे ते किती बरोबर होतं हे अशावेळी समजतं आणि अर्थपूर्ण जगणं असेल तर ते नक्‍की आनंद देणारं असतं. आपण स्वतःबरोबर एकटे असताना आनंदी असतो का? आपण स्वतःशी बोलतो का? आपण आपल्या भावना, घडलेले प्रसंग-बोलाचाली हे लिहितो का? (नंतर कोणाला न दाखवता फाडलं तरी चालेल) पण आपण त्या गुंत्यातून मोकळे होतो. मन राग, लोभ, प्रेम, दोष यातून मोकळं होतं, त्याच त्या ठिकाणी अडकून पडत नाही.

आपण रिकाम्या वेळात फालतू गप्पा, टीव्ही, व्हॉटसऍप यात वेळ न घालवता वाचन, संगीत, हिंडणं, इतर छंद असा वेळ घालवला तर दिवसही पुरणार नाही. आणि सगळं तर आपण आनंदी जगण्यासाठीच करत असतो ना? प्रत्येकजण प्रत्येक क्षणी- मग सगळ्या पंचेंद्रियांनी जगा, आपल्या कामात बुडून जा, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण करा- जगणं आपोआप आनंदी होईल आणि हो सगळं कराल ते आनंदानं करा, आनंदासाठी करू नका. कुठं पोचतो यापेक्षा प्रवास महत्त्वाचा आहे. बेस्ट लक फॉर हॅपी जर्नी!

सहजानंद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.